गडचिरोली, : – विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके आदीचे जीवनमान सुसहय करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोचविण्याकरिता गडचिरोली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण तसेच जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांचे विहीत नमुन्यात अर्ज ग्राम महसुल अधिका-यांकडून तपासणी झाल्यानंतर आपले सेवा केंद्र चालकामार्फत ऑनलाईन भरुन घेण्यात येतात.
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज दिनांक 04 नोव्हेंबर, 2026 रोजी संजय गांधी निराधार योजना समिती, गडचिरोली समोर ठेवून समितीचे अध्यक्ष यश कोंडावार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजीत करण्यांत आली. सदर सभेला वसंत गावतुरे, सदस्य, दिपक भारसागडे, सदस्य, संदीप जिवन शिंगाडे, सदस्य, दत्तु माकोडे, सदस्य, प्रमोद सुधाकर उमरगुंडावार, सदस्य तसेच अनिकेत पाटील, संवर्ग विकास अधिकारी, गडचिरोली हे शासकीय सदस्य उपस्थित होते.
सदर सभेत पुढीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज मंजुर/नामंजुर करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एकूण 150 प्राप्त प्रकरणापैकी 140 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 10 प्रकरणे नामंजूर करण्यात आली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 67 प्राप्त प्रकरणापैकी 64 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 3 प्रकरणे नामंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 21 प्राप्त प्रकरणापैकी 16 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 5 प्रकरणे नामंजूर करण्यात आली.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 17 प्राप्त प्रकरणापैकी 12 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 5 प्रकरणे नामंजूर करण्यात आली.
सदर सभेकरिता डि. ए. ठाकरे, नायब तहसिलदार (सं.गां.यो.) तहसिल कार्यालय, गडचिरोली, अमोल नन्नावरे, सहा. महसुल अधिकारी, एस. जे. नरुले, महसुल सहाय्यक, यांनी विशेष सहाय्य योजनेची ऑनलाईन प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले.
विशेष सहाय्य योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र लाभार्थ्याचे अर्ज ग्राम महसुल अधिका-यांकडून तपासणी झाल्यानंतर आपले सेवा केंद्र चालकामार्फत ऑनलाईन तहसिल कार्यालयास सादर करणेबाबत तहसिलदार, गडचिरोली यांनी जाहीर आवाहन केले आहे.