AVB NEWS चंद्रपूर : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत अनेक भागांतील धान पिकांची कापणी पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी कापणीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तातडीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करून धान खरेदीला सुरुवात करावी, अशी मागणी काँग्रेस नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. येथील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित धान पिकावर अवलंबून असते. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यातच धान कापणीनंतर शासकीय खरेदी केंद्रे वेळेत सुरू न झाल्यास शेतकऱ्यांना कापणी केलेले धान शेतात किंवा उघड्यावर ठेवण्याची वेळ येते. दरवर्षी धान कापणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे धान भिजणे, त्याची गुणवत्ता खालावणे आणि आर्थिक नुकसान होणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
शासकीय धान खरेदी केंद्रे वेळेत सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागते. परिणामी, धान साठवून ठेवण्याचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडतो. अवकाळी पावसाचा धोका लक्षात घेता, शासनाने धान खरेदी प्रक्रियेला विलंब न करता तातडीने सुरुवात करणे आवश्यक आहे. वेळेत धान खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना आपले उत्पादन सुरक्षितपणे विकता येईल आणि संभाव्य नुकसानही टाळता येईल.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील सर्व आवश्यक शासकीय धान खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत. तसेच धान खरेदीची प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आपले धान विकता येईल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.